Contact us Search site Sitemap
P. L. Deshpande
 
 
   
 

पुल (पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे) यांचे घराणे गरीब होते असे नाही. परंतु ते श्रीमंतही नव्हते. त्यांचे वडील सामान्य नोकरीत होते. पण हौशी होते. त्यांना गाण्याबजावण्याची, नाटकांची हौस होती. दर आठवड्याला ते सहकुटुंब सहपरिवार नाटके बघायचे. त्यांना ज्योतिषाचे उत्तम ज्ञान होते. त्यांनी पुलंचे बत्तिसाव्या वर्षापर्यंतचे भविष्य लिहून ठेवले होते. ते सापडल्यानंतर पुलंचे आयुष्य बत्तिसाव्या वर्षापर्यंतच आहे असे वाटून पुल आणि सुनिताबाई यांची काही काळ गाळण उडाली होती. बत्तिसावे वर्ष उलटल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की बत्तिसाव्या वर्षापर्यंतच भविष्य लिहून ठेवणे त्यांच्या वडिलांना शक्य झाले होते. त्यानंतर त्यांना सवड मिळाली नव्हती.

पुलंच्या आईच्या म्हणण्याप्रमाणे पुलंच्या वडिलांना स्वत:ची जाण्याची वेळ , दिवस वगैरे सर्व माहीत होते. ते तरुणपणीच निवर्तले. जाण्याआधी त्यांनी पुलंना जवळ बसविले आणि अभंग भजने वगैरे म्हणायला सांगितली. ’जेथे जातो तेथे तू माझा सांगाती’ किंवा ’आम्ही जातो आमुच्या गावा’ ही भजने सांगून त्यांनी ती पुलंच्या तोंडून ऐकली, आणि मग आपले प्राण सोडले. प्राण सोडण्याआधी त्यांनी पुलंच्या आईला जवळ बोलावले आणि सांगितले, "तू याचे मोठमोठे मानसन्मान बघशील. मला मात्र काहीच दिसणार नाही. मी जातो ---"वडिलांच्या निधनानंतर पुलंनी लवकरच मुंबई सोडली. पोटासाठी, शिक्षणासाठी त्यांना खूप धडपडावे लागले. कुठे कुठे किरकोळ नोकऱ्या करीत, नाटकात, चित्रपटात कामे करीत, चित्रपटासाठी लेखन करीत ते थोडीबहुत कमाई करीत होते आणि जोडीला जमेल तसे शिक्षण घेत होते.

चिंतामणराव कोल्हटकरांकडे नाट्यकलेचे धडे घेता घेता ते कॉलेजचेही शिक्षण घेत होते. पुढे ते कवी गिरीश यांच्याकडे सांगलीला गेले. पुलंचा शेवटचा चित्रपट म्हणजे ’गुळाचा गणपती’! त्यात सर्व काही पुलंचे होते. कथा, पटकथा, संवाद, गीते, संगीत आणि दिग्दर्शन, एवढेच नव्हे तर नायकाची भूमिका सुद्धा! हा चित्रपट सर्वत्र चांगला गाजला. पण पुलंची कमाई काय? पुण्यात ’गुळाचा गणपती’ प्रदर्शित झाला तेव्हा तो चित्रपट पाहण्यासाठी पुलंना साधे आमंत्रणसुद्धा नव्हते. पुल, सुनीताबाई आणि मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांनी तिकिटे काढून चित्रपटाचा पहिला खेळ पाहिला!

पण कोणत्याही प्रकारचा कडवटपणा मनात न ठेवता ते चित्रपटव्यवसायातून बाहेर पडले, आणि शिक्षणव्यवसायात आले. १९५० च्या जूनमध्ये ते एम. ए. झाले आणि नोव्हेंबरमध्ये बेळगावच्या राणी पर्वतीदेवी कॉलेजात मराठीचे प्राध्यापक म्हणून गेले. पुल आणि मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांचे मित्र आणि त्या कॉलेजचे उपप्राचार्य बाबूराव (आर. एस.) रेगे यांनी त्यांना मुद्दाम बोलावून बेळगावला नेले. प्राध्यापक म्हणून नेमणूक होताच पुलंचे आजोबा ऋग्वेदी यांना अतिशय आनंद झाला. आपला व्रात्य, खोडकर, अवखळ नातू आता मार्गी लागला असे त्यांना वाटले. ते पुलंना म्हणाले, "अरे, आता तू प्रोफेसर झालास, जरा गंभीरपणे वागायला शीक! लोक विद्वान म्हणून तुझ्याकडे पाहणार!" पण तो योग आला नाही. पुल विद्यार्थीवर्गात अतिशय प्रिय होते. पण कॉलेजच्या चालकांशी त्यांचे जमले नाही. बेळगावतल्या कलाप्रेमी लोकांचे प्रेम आणि ‘रावसाहेबां’सारखे मित्र एवढे गाठीला बांधून पुलंनी दोन वर्षात कॉलेज सोडले. कॉलेजचे चालक विरुद्ध प्राध्यापक-विद्यार्थी असा झगडा सुरू होताच पुल उघडपणे चालकांच्या विरुद्ध उभे राहिले. भांडले, संप केला आणि बेळगाव सोडून मुंबईस आले. पुन्हा मुंबईच्या कीर्ती कॉलेजात मराठी प्राध्यापक. मग मालेगावी महात्मा गांधी विद्यामंदिराचे प्रमुख. पुढे पुणे, मुंबई, दिल्ली येथे आकशवाणीत. युनेस्कोच्या शिष्यवृत्तीवर लंडन येथे ब्रॉडकास्टिंग आणि टेलिव्हिजन यांचे प्रशिक्षण. पुन्हा दिल्ली येथे टेलिव्हिजनमध्ये. भारतात दूरदर्शनवर पहिला कार्यक्रम सदर करण्याचा मान.

असे सर्व उत्तम चालले होते. चारचौघांच्या दृष्टीने दिल्लीत ते सुखी होते. पं. नेहरूंपर्यंत सर्व माणसे त्यांच्यावर खूष होती. सर्व सहकाऱ्यांत हे ‘पांडेजी’ प्रिय होते. पण कुठेही स्थिर होण्याची पुलंची प्रवृत्ती नाही. ते एकाएकी सरकारी खात्याला उबगले. एक कलावंत म्हणून आपला कोंडमारा होतो आहे असे त्यांना वाटले. त्या क्षणी तडकाफडकी राजीनामा देऊन त्यांनी दिल्लीचा तंबू हलवला. पुढे काय हे त्यांना माहीत नव्हते. त्यांनी एकपात्री कार्यक्रम नुकतेच सुरू केले होते. पण त्या कार्यक्रमांचे भवितव्य ठरायचे होते. पण तोपर्यंत त्यांनी धीर धरला नाही. एके ठिकाणी फार काळ थांबायचे नाही, मागल्या ठिकाणाचा लोभ किंवा कडवटपणा बरोबर आणायचा नाही, नव्या ठिकाणी एखाद्या पोराच्या उत्साहाने वावरायचे, परत पिशवी खांद्यावर मारून नवे ठिकाण... असे त्यांचे सतत चालत आले आहे. पुलंच्या आणि मराठी रसिकांच्या सुदैवाने पुलंचे एकपात्री किंवा बहुरुपी कार्यक्रम अतोनात यशस्वी झाले. ’बटाट्याची चाळ’, ’असा मी असामी’, ’वाऱ्यावरची वरात’, ’वटवट’ हे सर्व कार्यक्रम खूप गाजले. ’चाळी’ ने तर लोकांना अक्षरश: वेड लावले.

या कार्यक्रमांतून आणि लेखनातून पुलंना कोणत्याही हिशोबाने बऱ्यापैकी पैसा मिळाला. कोणीही हा पैसा उधळला असता, चैन केली असती, किंवा पुढील आयुष्याची तरतूद म्हणून जपून ठेवला असता. परंतु पुलंनी यापैकी काहीही केले नाही. त्यांनी मिळालेल्या बहुतेक पैशाचा ट्रस्ट करुन तो पैसा सार्वजनिक सेवाकार्याला दिला. अनाथ विद्यार्थी गृह, अंधशाळा, बाबा आमटे यांचा कुष्ठाश्रम, रुग्णालये, रक्‍तपेढी अशा किती तरी संस्थांना आणि कार्यांना त्यांनी काही लाख रुपये दिले. प्रस्तुत पुस्तकही विक्रीला येण्याआधीच त्या पुस्तकाचे काही हजार रुपयांचे मानधन स्वत: न घेता ते पूर्णपणे सार्वजनिक संस्थेला देण्याचे त्यांनी निश्चित केले.

पुलंच्या व्यक्‍तिमत्वातला सामाजिक दानतीचा भाग मला अत्यंत दुर्मिळ आणि म्हणूनच खूप विलोभनीय वाटतो. सामाजिक बांधिलकीचा हा गुण मला पूजनीय वाटतो. आणि हे सारे देताना किंवा दिल्यानंतर ते एका शब्दाने त्याची कधी मचमच करीत नाहीत. एखाद्या मध्यमवर्गातला माणूस जसा राहील तेवढ्या राहणीला आवश्यक तेवढी त्यांची मासिक प्राप्ती आहे. तेवढे व्याज सुटेल एवढी तरतूद त्यांनी केली आहे. चैन त्यांना सहज शक्य होतील. पण त्यांच्याच नव्हे, तर सुनीताबाईंच्याही वृत्तीत एक प्रकारचे खरेखुरे वैराग्य आहे. रेशनमध्ये घाणेरडा तांदूळ मिळत असे आणि बाहेर काळ्या बाजारात उत्तम तांदूळ मिळत होता तेव्हासुद्धा सुनीताबाई रांगेत उभ्या राहून रेशनचाच तांदूळ खात होत्या --- काळ्या बाजारातला तांदूळ परवडण्यासारखा होता तरीही! पुलंचा पोषाखसुद्धा काय? खादीचा पायजमा आणि हातमागाच्या जाड कापडाचा ढगळ सदरा! पं. वसंतराव देशपांडे तर विनोदाने पुलंचे कपडे शिंप्याने शिवल्यासारखे वाटत नाहीत असे म्हणत असतात.

पुलंच्या स्वभावात एक भारुन जाण्याचा गुण आहे. पुलंना जो वाचकवर्ग, श्रोतृवर्ग, प्रेक्षकवर्ग लाभला आहे तसा तो अन्य कुठल्याही मराठी लेखकाला लाभलेला नाही. पुल आणि लोक यांच्यात जी एक जवळीक साधली गेली आहे तशी अन्य कोणालाही साधता गेली नाही. पुलंनी स्वत:च असे म्हटले आहे की, मी जात्यावरच्या गोड ओव्या ऐकल्या आहेत. अजूनही मला त्या ओव्यांची ओढ आहे. पण त्यासाठी कुणी जाते ओढत बसले पाहिजे असे मला वाटत नाही. हे एकेका स्वभावाचे रसायन असते. परंतु जुन्याची ओढ आहे म्हणून सनातनी मार्गाची ओढ आहे असे नव्हे. उलट सनातनी गोष्टींचा तिटकारा आहे. त्यांचे वडील वारले तेव्हा पुल २०-२२ वर्षांचे होते. पण त्यांनी त्यावेळेस सुद्धा मर्तिकाबरोबर येणारी कर्मकांड केली नाहीत.

जे जे काही नवीन दिसेल, जे जे समाजाला उपकारक आहे असे वाटेल त्यात पुल उत्साहानेच नव्हे तर अतिउत्साहाने उडी घेणार हे ठरलेलेच असते. विनोबांचे भूदान कार्य म्हणा किंवा बाबा आमटे यांचे कुष्ठाश्रमाचे कार्य म्हणा, त्यात पुल अक्षरश: बुडून जातात. पुलंची दुसरी एक गोष्ट महत्वाची आणि अनुकरणीय वाटते. चित्रपटसृष्टीत म्हणा किंवा बेळगावच्या कॉलेजात म्हणा काही साधण्यासाठी त्यांनी कधी तडजोडी केल्या नाहीत, किंवा लाचारी पत्करली नाही. मालेगाव प्रकरण हे त्यांच्याच नव्हे, तर सुनीताबाईंच्याही नेकीचे एक उत्तम उदाहरण आहे. भाऊसाहेब हिरे यांनी मंत्रीपदावर असताना आपल्या मालेगावी महात्मा गांधी विद्यामंदिर काढले. तेथे प्रमुख म्हणून सुनीताबाईंना नेले. या विद्यामंदिरामागे जी ध्येयवादी कल्पना होती तिचे या दोघांना आकर्षण वाटले. पुलंना पूर्वीपासून शांतिनिकेतनचे वेड होते. त्या धर्तीवर महात्मा गांधी विद्यामंदीर चालवावे; विद्या, निसर्ग, जीवन एकमेकात गोवून शेतकऱ्यांच्या मुलांना जीवनोन्मुख करावे या उच्च ध्येयाने प्रेरित होऊन पुल आणि सुनीताबाई मालेगावला गेल्या. सुनीताबाई या ठाकूर असताना त्या राष्ट्रीय चळवळीशी, राष्ट्रसेवादलाशी, समाजवादी विचाराशी निगडीत होत्या. त्यामुळे दोघांनाही मालेगावी नवीन क्षितिजे दिसली. त्या काळी भाऊसाहेब हिरे हे राजकारण आणि सत्ताकारण यांतले मोठे प्रस्थ होते. त्यांच्याशी जुळवून घेतले असते तर खूप काही करता आले असते. परंतु त्या संस्थेच्या एकूण व्यवहाराबद्दल शंका निर्माण होताच पुल आणि सुनीताबाई यांनी काही दिवसातच राजीनामा देऊन मालेगाव सोडले. नुसतेच काही साधायचे असते तर त्यांना त्या व्यवहाराकडे कानाडोळा करता आला असता! पण पुल अशा गोष्टींपासून नेहमीच अलिप्त राहिले आहेत.

१९७७ मध्ये लोकसभेच्या ऐतिहासिक निवडणुका आल्या. इंदिरा गांधींची कौटुंबिक एकाधिकारशाही मोडून काढण्यासाठी पुलंनी जनता पक्षाच्या बाजूने प्रचारात उडी घेतली. इतर कोणाही वक्‍त्यापाशी नसलेले विनोदाचे धारदार शस्त्र पुलंकडे होते. त्यामुळे पुलंची भाषणे ऐकण्यासाठी लाखो लोक जमू लागले. त्यामुळे पुलंची भाषणे ऐकण्यासाठी लाखो लोक जमू लागले. त्यामुळे साहजिकच त्यावेळचे केंद्रीय मंत्री यशवंतराव चव्हाण आणि मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण व्यक्‍तिश: पुलंवर खूप बिथरले होते. पुलंच्या प्रचाराचा फार मोठा प्रभाव पडतो आहे असे त्यांना वाटू लागले होते. त्यामुळे त्या दोघांनाही पुलंना ‘विदूषक’ वगैरे म्हणून त्यांच्यावर टीकेचा भडीमार केला होता. पुलंचे व्यक्‍तिमत्व मोठे गंमतीदार आहे. गुंतागुतीचे आहे. त्यांना जुन्यातल्या चांगल्याची ओढ आहे. आधुनिकतेचे आकर्षणही आहे. नवीन विचाराशी ते तादात्म्य पावतात. त्यांची जिज्ञासा दुर्दम्य आहे. वाचन चौफेर आहे. काही तरी झपाटणारे वाचनात आले की आसपासच्या लोकांना फोन करून किंवा पत्रे लिहून त्यात सहभागी करून घेण्याचा उत्साह आहे. ’माणूस’ ह्या गोष्टीत त्यांना अतोनात रस आहे. भरडला जाणाऱ्याबद्दल अस्सल कळवळा आहे. त्यांचे स्वत:चे रागलोभ माणसासारखेच आहेत. पण ते असतानाही त्यांचे साहित्यिक भान कधी सुटलेले दिसत नाही.

आणीबाणीच्या काळात एक दुर्गाबाई सोडल्या तर कुठल्याही मराठी साहित्यिकाने उघडपणे आणि छुपेपणानेही फारसे काही केले नाही. पण छुपेपणाने जे थोडेफार कार्य झाले त्यात पुलंचा हिस्सा फार मोठा होता. भूमिगतांना आर्थिक साहाय्य देणे, गुप्तसाहित्याचा प्रसार करणे, जयप्रकाशांच्या रोजनिशीचे उत्तम भाषांतर करून ते प्रसिद्ध करण्याची व्यवस्था करणे, प्रसिद्धीनंतर त्याचे वितरण करणे अशी अनेक कामे पुल आणि सुनीताबाई यांनी केली. त्या वेळी प्रतिकाराची अनेक पत्रे निघत. त्यासाठी आमचे पुढारीपण पुलंकडे होते. सल्लामसलत त्यांच्याशी असायची. पहिली सही त्यांची असायची. लेखकांचे नेतृत्व पुलंकडे चालून गेलेले आहे हे खरे आहे. त्यांचे लेखन लोकांना आवडते. त्यांचे लेखनातून आणि वक्‍तृत्वातून व्यक्‍त होणारे विचार लोकांना महत्वाचे वाटतात. त्यांच्या सामाजिक दानतीने लोक आकर्षित होतात. त्यांचे वैयक्‍तिक चरित्र अतिशय स्वच्छ आहे. वय, वित्त, व्यवसाय, जात हे सारे विसरून त्यांचा सर्व थरांशी संपर्क आहे. देशभर साहित्य, नाट्य, संगीत अशा क्षेत्रांत देवाणघेवाण असलेला हा एकमेव लेखक आहे. त्यांचा हसता खेळता स्वभाव आहे. बघावे तेव्हा ते प्रफुल्लित असतात. या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम होऊन आम्ही आमचे नेतृत्व पुलंकडे दिले आहे किंवा पुलंकडे ते आपोआप चालून गेले आहे असे मला वाटते. पुलंचा हजरजबाबी विनोद हा तर विलक्षण आहे. फटाफट विनोद फोडून हशा घेणे यात तर त्यांचा हातखंडाच आहे.
असे हे एकूण गंमतीदार आणि तेवढेच विलोभनीय असे रंगीबेरंगी व्यक्‍तिमत्व आहे...

- जयवंत दळवी (८ नोव्हेंबर १९७९)

  साभार :
  - पु. ल. : एक साठवण (मॅजेस्टिक प्रकाशन)

 

 
 
: Follow us on Facebook for regular updates :
Prabodhan Goregaon
 
 
 
Best viewed in 1024 x 768 resolution
  Concept & Data Management : Mr. Sunil Velankar
Site designed by : Pristine Multimedia Pvt. Ltd.